मुलं देखील घर सोडून जातात
मुलं देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
जिवापाड जपलेला डेस्कटॉप संगणकसोडून
कपाटावर गिटार धूळ खात टाकून
व्यायामाची डंबेल्स आणि इतर साधनं
मेजावर बेदरकारपणे नोट्स, पेन्स, पेन्सिली टाकून
मुलं देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
मला हा रंग / फॅशन पसंत नाही
म्हणून नवा कोरा शर्ट कपाटात तस्साच ठेवून
पदवीदान समारंभासाठी शिवलेला ब्लेझर
जुने मोजे, बनियन्स, रुमाल (या वस्तू का संभाळून ठेवतात?”
आम्ही बावळटपणे जपल्यात,
त्यांना काही घेणं देणं नाही
मुलं देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
झोपताना जी उशी हटकून लागायची
तिच्याशिवाय आता कुठं शांत झोप येत असेल त्यांना
ताटात अन्न दिसलं की नखरे करणारे
आता मिळेल ते खात असतील
आपली खोली, आपल्या वस्तूबद्दल स्वामित्वाची भावना जपणारे
आता नाईलाजाने सगळं शेअर करीत असतील
करियरच्या नादात
मुलं देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
आई-बापाला ‘सगळं ठीक चाललंय’ म्हणून थापा मारतात –
खोटे दिलासे देतात
लहानपणी हजार हट्ट करणारे आता
सगळ्याला नको नको म्हणतात
कमावता मुलगा होण्याच्या नादात
मुलं देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
पक्कं ठाऊकाय,
आता ते परतणार नाहीत,
आलेच तर तुटपुंज्या सुट्टीपुरते
त्यांच्या करियरचं विमान त्यांना
आमच्यापासून दूर घेऊन जाईल
तरी आम्ही त्यांची खोली, त्यांच्या वस्तू रोज स्वच्छ करून ठेवतो,
त्यांनी भिंतीवर चिकटवलेली चित्रं न्याहाळतो
(कधी कधी ती उगीचच अस्पष्ट, धुरकट दिसतात)
जवळ असताना कार्टी कशी छळायची
ते क्षण हळवे होऊन स्मरतो
आता मनात आणलं तरी तो गोड छळ नशिबात नाही
कारण मुलींसारखेच मुलगे देखील घर सोडून जातात
जगाच्या बाजारात हरवून जातात
Comments
Post a Comment