ब्रेक के बाद.....भेट नवी उत्साह नवा.
खूप दिवस झाले नवीन काही लिहिले नव्हते...वाटलं घ्यावा छोटासा ब्रेक...काय करू हल्ली जमाना "ब्रेक के बाद" चाच आहे ना😂😂..दुसरे असे की तुम्हीही कंटाळला असाल ना मी लिहिलेले वाचून?😂😂..मग म्हटलं घ्यावा एक छोटासा ब्रेक.
"ब्रेक...अल्पविराम" म्हणा हवे तर...पण कधी कधी खूप गरजेचा होवून जातो...एकसुरी बनू पाहणाऱ्या आयुष्याला देखील याची नितांत गरज असते....आणि मग तो हवा हवासा ब्रेक मिळाला की तिथून पुढचे आयुष्य 'लय'बध्द होते... नि यदा कदाचित येवू घातलेला 'प्रलय' देखील थोपविला जावू शकतो..टाळला जावू शकतो...अगदी कालचीच गोष्ट आहे.मी माझ्या जवळच्या नातेवाईक यांच्या कडे गेलो होतो..तसे गेलो होतो "सांत्वना" साठी...कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाने ध्यानी मनी नसताना आत्महत्या करून या अमूल्य आयुष्याचा चटका लावणारा शेवट केला होता..एक अशी सुशिक्षित व्यक्ती जी असा टोकाचा निर्णय घेवूच शकणार नाही.... असे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही बातमी ऐकल्यावर वाटत होते... काल त्यांच्या मागे उघड्यावर पडलेल्या त्यांची मुले आणि पत्नी यांच्या मनातील आर्त भाव ऐकल्यावर मन अगदी गहिवरून आले होते.
ती व्यक्ती आज हे जग सोडून भले निघून गेली असली तरी आठवणींना मात्र "विसर न पडण्याचा" शापच असतो जणू...आणि त्या आठवणी जर कटू असतील तर मग तर तो महाशापच!एखाद्या घरचा पुरुष जेंव्हा जातो...तो फक्त पुरुष नसतो तर तो त्या घरचा सर्वार्थाने "बाप" असतो.मला तर वाटते बाप म्हणजे एक अवाढव्य असे आकाशच असते जणू..."आई ही धरती असते तर बाप हा त्या घरचं आकाश असतो"..तुम्ही धरतीवर उभे आहात आणि तुमच्या डोक्यावर आकाशच नाही...एक असे आकाश जे तुम्हाला नेहमी त्याच्या कवेत घेवून सुखावलेले असते... हे पाहता कसे वाटेल मग तुम्हाला?
खुणवते मज आकाश नेहमी...
त्याची निळाई मनाला रंगवून जाते
घेवू कवेत त्याला कसे मी
मग मजला बापाचे रूप हे आठवते...
खरंच खूप अवघड असते एखाद्याच्या मनाचा थांग लागायला...त्याचे मन समजून घ्यायला...एखाद्याच्या कशाला...कधी कधी स्वतःचे मन देखील समजून घेणे खूप अवघड आहे असे वाटत राहते..
न उमगे जे भल्या भल्याना...ते मन
अथांग शब्दही फिका वाटे ज्यापुढे.. ते मन.
मात्र याच मनाला समर्थ रामदासांनी अगदी अचूक असे श्लोक बद्घ केले आहे आपल्या "मनाचे श्लोक" मधून..आजच्या या धकाधकीच्या काळात आणि स्पर्धेच्या युगात जर आपल्याला अगदी खंबीर राहावयाचे असेल तर मनाचे श्लोक या सारखा दुसरा कुठला आधार नाही...तारणहार नाही..
आणि दुसरा महत्वाचा आहे तो हा...ब्रेक...एक अल्पविराम.
एक असा क्षण जो तुम्हाला अंतर्मुख करून आयुष्याच्या काही नको असलेल्या फाईल्स फॉरमॅट करण्यासाठी एक हक्काची विश्रांती देतो...वेळोवेळी जर आपण असा ब्रेक घेत राहिलो तर आपले आयुष्य नको असलेल्या फाईल्स मुळे कधीच हँग होणार नाही...आणि मग स्वतः हँग करून दुसऱ्याचा जीव टांगणीला लावण्याचे पाप आपल्या हातून कधीच होणार नाही...हो मला तर आत्महत्या हे पापच वाटते जणू...देवाने इतके सुंदर आयुष्य दिले असताना जर तुम्ही त्या आयुष्याला तुमच्या अश्या विचाराने ग्रहण लावणार असाल तर यासारखे दुसरे पाप नाही...
मी कोणी मोठा तत्ववेत्ता वगैरे नाही पण रोजच्या आयुष्यात समोर दिसणाऱ्या काही गोष्टींनी मन गहिवरून येते...मग वाटते काय हरकत आहे...काही गोष्टी आपल्या या लिखाणातून शब्दांच्या सहाय्याने वाचकांसमोर मांडण्यात? या शब्दांच्या आधाराने यदा कदाचित एखादा मनाने खचलेला 'जीव'...खऱ्या अर्थाने पुन्हा 'सजीव' होवून...जीवनाला आनंदाने नव्या उत्साहाने...नव्या उमेदीने सामोरे जाईल..
माझ्या या शब्दांच्या पंखावर बसून आकाशाला कवेत घेवू पाहील.तर आपले हे लिहिणे सफल झाले असे मला वाटेल.
तेंव्हा मित्रांनो...हा ब्रेक...अल्पविराम तुम्हीही नक्की घेत जावा....जो तुम्हाला पुन्हा ताजेतवाने करून एका नव्या आयुष्य रुपी
फुलाला तुमच्या समोर उलगडेल...आणि हे उमललेले नवे फुल तुमचे सर्व आयुष्य सुगंधाने भारावून टाकेल...😊तुमची एका नवीन आयुष्याशी भेट घडवून आणेल...अगदी नव्या आणि हव्या असलेल्या उत्साहात...🥀🥀🌷🌺🌻
कशी वाटली वाचक मित्रांनो तुम्हाला ही माझी ब्रेक नंतर ची भेट...हवीहवीशी वाटली का नाही?
नक्की सांगा कमेंट मध्ये कारण...तुम्हाला माहिती आहे मी भुकेला आहे..शब्दांचा...प्रेमाच्या चार अक्षरांचा....👃
Comments
Post a Comment